चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावचे सुपुत्र आणि मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (MRAI) चे कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे यांनी टोकियो, जपान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ४थ्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय शिखर परिषद (IBS 2026) आणि एमआरएआय रोडशोच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत कोकणासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास, जपान येथे आर्थिक व वाणिज्य मंत्री श्रीमती देबजानी चक्रवर्ती यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला एमआरएआयचे सचिव जनरल अमर सिंह, संचालक बी. के. सोनी आणि कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे उपस्थित होते.
बैठकीत भारतातील पुनर्वापर (Recycling) उद्योगाची सद्यस्थिती, परिपत्रक अर्थव्यवस्था (Circular Economy), शाश्वत विकास (Sustainable Development), संसाधन सुरक्षितता (Resource Security) तसेच भारत-जपान यांच्यातील औद्योगिक सहकार्य वाढविण्याच्या विविध संधींवर सखोल चर्चा करण्यात आली.
एमआरएआयच्या प्रतिनिधींनी भारतात धातू, प्लास्टिक, कागद, ई-कचरा, बॅटरी, टायर, वस्त्रोद्योगातील कचरा, वापरलेले तेल, कालबाह्य वाहने (End-of-Life Vehicles) तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरणपूरक उद्योगविकास आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचीही सविस्तर माहिती या बैठकीत मांडण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमात कम्युनिकेशन प्रमुख म्हणून प्रमोद शिंदे यांनी विविध देशांतील जागतिक दर्जाचे वक्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. भारताच्या उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या सुरक्षिततेसाठी (Raw Material Security) तसेच पुनर्वापर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी जागतिक स्तरावर संवाद निर्माण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
बैठकीदरम्यान श्रीमती देबजानी चक्रवर्ती यांनी एमआरएआयच्या कार्याचे कौतुक करत टोकियो रोडशोसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली. तसेच भारत आणि जपान यांच्यात पुनर्वापर उद्योग, संसाधन पुनर्प्राप्ती, प्रगत तंत्रज्ञान, हरित गुंतवणूक आणि परिपत्रक अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
दरम्यान, ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत टोकियो येथे होणारी IBS 2026 परिषद भारत आणि जपानमधील उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाला चालना देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या परिषदेमुळे दोन्ही देशांतील उद्योग क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चिपळूणच्या पेढांबे गावातील सुपुत्र प्रमोद शिंदे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनात बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची बाब नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि कोकणासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. त्यांच्या कार्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय पुनर्वापर उद्योगाची प्रतिमा अधिक भक्कम होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













