दापोली : कृषी सखी गटातर्फे ‘उपयुक्त व अपायकारक कीटक ओळख आणि व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक संपन्न

banner 468x60

प्रतिनिधी : सागर गोवळे
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी सखी गटाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी ‘उपयुक्त व अपायकारक कीटक ओळख आणि व्यवस्थापन’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना पिकांवरील किडींची अचूक ओळख करून देणे, योग्य व्यवस्थापन पद्धती समजावून सांगणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

प्रात्यक्षिकादरम्यान कृषी सखी गटातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्रमुख पिके असलेल्या आंबा, काजू आणि भात पिकांवर आढळणाऱ्या विविध अपायकारक किडींची माहिती दिली. किडींची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे, पिकांवरील होणारे नुकसान तसेच शिफारस केलेले प्रभावी नियंत्रण उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

banner 728x90

याशिवाय शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मधमाशी, लेडीबर्ड बीटल (लेडीबर्ड भुंगेरे) आणि ग्रीन लेसविंग यांसारख्या मित्र कीटकांचे संवर्धन करण्याचे महत्त्वही प्रात्यक्षिकातून अधोरेखित करण्यात आले. परागीकरण प्रक्रियेमधील त्यांचे योगदान आणि नैसर्गिकरीत्या जैविक कीड नियंत्रणामधील त्यांची भूमिका शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव मांडत विविध शंकांचे निरसन करून घेतले. फोटो, पोस्टर्स आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली.

प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी कृषी सखी गटातील विद्यार्थिनी शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी विशेष परिश्रम घेतले व प्रात्यक्षिकाचे प्रभावी सादरीकरण केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण झाली. रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळून उपयुक्त कीटकांचे संवर्धन करणे ही शाश्वत शेतीची गरज असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *