राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान रत्नागिरी नगर परिषदेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ लक्ष्मण गोताड (मूळ रा. चांदोर, सध्या रा. फगरवठार, परटवणे, ता. जि. रत्नागिरी) हे रत्नागिरी नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
२ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शुक्रवारी सकाळपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून परिसरात स्वच्छता व साफसफाईचे काम सुरू होते.
याचवेळी साफसफाई करत असताना काशिनाथ गोताड यांच्या पायाला फुरसे (Russell’s Viper) या महाविषारी सापाने दंश केला. सर्पदंश होताच ते जागीच कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडलेल्या या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत असून, काशिनाथ गोताड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणाची पुढील कायदेशीर नोंद संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













