संगमेश्वर : तीन महिन्यांपासून पाण्याचा थेंब नाही, संगमेश्वरातील कुटगिरी-येडगेवाडीतील पाच कुटुंबांचे बेमुदत उपोषण

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. कुटगिरी-येडगेवाडी येथील धनगर समाजातील पाच कुटुंबांनी पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी देवरुख पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून या कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असतानाही या कुटुंबांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

banner 728x90

कुटगिरी-येडगेवाडी येथील नागरिकांना शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या विहिरीवरून टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचा आरोप संबंधित कुटुंबांनी केला आहे. पाईपलाईन दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

वारंवार निवेदने देऊनही समस्या सुटली नसल्याने अखेर नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते आणि पाणीपुरवठ्याची समस्या कधी सुटते, याकडे कुटगिरी-येडगेवाडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *