रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) यांनी बावनदी पुलावरून नदीत उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास महेश भरणकर हे बावनदी येथील जुन्या पुलावर आले होते. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. नागरिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा तसेच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच त्यांनी नदीत उडी घेतल्याने उपस्थित नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नदी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच उपलब्ध साधनांच्या सहाय्याने महेश भरणकर यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. महेश भरणकर यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून तसेच संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली जात आहे.
या घटनेनंतर बावनदी पुल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













