अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल स्नॅचिंगच्या दोन धाडसी घटनांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ₹1.08 लाखांचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे 2026 रोजी सायंकाळी पवारवाडी फाटा येथे आशिष कृष्णा जाधव यांना चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. त्याच दिवशी शिरगाव-रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया रोहित शिंदे यांच्याकडील मोबाईलही अशाच पद्धतीने लंपास करण्यात आला.
या दोन्ही घटनांप्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 304(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध धागेदोऱ्यांच्या आधारे तपास करत 22 जुलै 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे धाड टाकण्यात आली. या कारवाईत विश्वनाथ अमर शिंदे (23), प्रथमेश मलिक मोरे (20) आणि अक्षय संभाजी जाधव (23) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपींनी दोन्ही मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा ₹1.08 लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अलोरे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













