चिपळूण : नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचेल अशी कृती केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार (दि. ५ जून २०२६) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मार्कंडी हायस्कूलसमोरील गुहागर-कराड युनायटेड मुख्य रस्त्यावर घडली. याबाबतची तक्रार शनिवारी (दि. ६ जून) पहाटे ४.३५ वाजता नोंदविण्यात आली.

या प्रकरणी रविकांत सूर्यकांत सातपुते (वय ४५), बांधकाम सहाय्यक, बांधकाम विभाग, चिपळूण नगर परिषद यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सचिन शेट्ये (वय ४०, रा. वाणी आळी, चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, चिपळूण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स उभारण्यात आले होते तसेच “काम सुरू असून पर्यायी मार्गाचा वापर करा” असे सूचना फलकही लावण्यात आले होते.

मात्र आरोपीने जेसीबी चालकाकडून खड्ड्यातील काढलेली माती पुन्हा भरून घेतली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेले बॅरिकेड्स व सूचना फलक हटवून रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केल्याचा आरोप आहे.

खड्ड्यात भरलेली माती ओली आणि चिखलयुक्त असल्याने रस्ता निसरडा बनला होता. अशा परिस्थितीत वाहनांची ये-जा सुरू झाल्यास वाहने घसरून अपघात होण्याची तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याशिवाय नगर परिषदेच्या सुरू असलेल्या शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने पुढील कामही बंद पडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम १२५ व २२१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पूर्वीच्या भारतीय दंड विधानातील कलम ३३६ (जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृती) आणि कलम १८६ (शासकीय कामात अडथळा) यास समांतर स्वरूपाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू असून संबंधितांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *