रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शासकीय मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका शिक्षण विभागालाही बसला असून लांजा तालुक्यातील दोन आणि चिपळूण तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने शिक्षण विभागाने शाळांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजनाला वेग दिला आहे. मागील दोन दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे काही शाळांच्या इमारतींच्या छतावरील पत्रे उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी कौलारू भाग कोसळल्याने वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय खिडक्या तुटणे, पावसाचे पाणी वर्गात शिरणे अशा प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत.
प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त शाळांचे प्रस्ताव संबंधित प्रशासनाकडून प्राप्त होताच दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत. जूनपूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्राधान्याने दुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था आधीपासूनच जीर्ण झाली असून त्यासाठी व्यापक दुरुस्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये छत दुरुस्ती, भिंतींची मजबुतीकरण कामे, खिडक्या-दरवाजे बदलणे तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणखी काही शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांचाही समावेश दुरुस्ती योजनेत केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील शाळांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













