खेड : अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध; खेड पोलिसांची वेगवान कारवाई

banner 468x60

खेड तालुक्यातील बिजघर लाववाडी येथून अपहरण झालेल्या १५ वर्षीय अपूर्वा अरुण कदम हिचा शोध लावण्यात खेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे ही अल्पवयीन मुलगी सुखरूपपणे पुन्हा आपल्या कुटुंबात परतली असून, परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

banner 728x90

शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास अपूर्वाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली होती. अपूर्वाची आई अस्मिता अरुण कदम (वय ४०) यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली.

पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने शोधमोहीम वेगात राबवली. दरम्यान, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले होते.

शोधमोहीम सुरू असतानाच खेड पोलीस ठाण्याच्या महिला व बाल कक्षातील महिला पोलीस विशाखा चव्हाण आणि जयश्री जाधव यांच्या पथकाला या मुलीबाबत अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मुलगी सापडल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. तिची ओळख व स्थिती याबाबत खातरजमा करून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अपूर्वा हिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी सुखरूप परतल्याने कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला.

या संपूर्ण कारवाईमुळे खेड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनोजा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *