चिपळूण : पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलिसांची प्रभावी कामगिरी, फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक

banner 468x60

चिपळूण शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रभावी कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे. रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा अवघ्या २४ तासांत तपास लावून आरोपींना अटक केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी आणखी एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.

दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ११ तोळे वजनाचे, अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. संबंधित महिलेने तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. नितीन बगाटे, महामुनी तसेच प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांची चौकशी आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका दिवसात संशयिताचा माग काढला.


या तपासादरम्यान एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून सर्व चोरीचे दागिने जप्त केले. त्यामुळे पीडित महिलेला तिचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाले असून पोलिसांच्या या जलद कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक मेंगडे हे २०२४ पासून चिपळूण येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात गांजा तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली आहेत. एप्रिल २०२६ मध्ये रामपूर येथील हत्याकांडाचा वेगाने तपास लावून दोन आरोपींना अटक करून त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली होती.

अल्पावधीत गुन्हे उकलण्याची क्षमता, तपासातील बारकाई आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी यामुळे फुलचंद मेंगडे यांची एक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून चिपळूण पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *