रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापर यांवर कठोर निर्बंध लादण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक. बी.बी. महामुनी यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले असून, सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील आगवे येथे एका इसमाला दोन बंदुका आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक १८ मार्च २०२६ रोजी सावर्डे परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मौजे आगवे (ता. चिपळूण) येथील महेश जाधव नावाचा इसम आपल्या घरामागे अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळील एका लाकडी खोपटीत एक इसम बंदूक साफ करताना पोलिसांना रंगेहात आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय ३५ वर्ष, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे सांगितले.
झडती दरम्यान त्याच्याकडे एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक, ९ जिवंत काडतुसे सापडून आली. या सर्व साहित्याची एकूण किंमत ७० हजार ९०० इतकी असून, शस्त्रांबाबत कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. आरोपी महेश जाधव याच्या विरुद्ध सावर्डे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१) आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














