रत्नागिरी : ओला शोरूमध्ये कर्मचाऱ्यांना घेराव, सेवा बंद झाल्याने संताप

banner 468x60

रत्नागिरीतील ओला शोरूम अनेक महिन्यांपासून बंद ठेवून अचानक पुन्हा सुरु केल्यानंतर बुधवारी ग्राहकांनी संतापाचा स्फोट घडवला. आक्रमक झालेल्या ग्राहकांनी थेट शोरूममध्ये घुसून कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या गोंधळात एका ग्राहकाने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने पेट्रोल टाकून शोरूम पेटवून देण्याची धमकी दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर ग्राहकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

काही महिन्यांपूर्वी ओला कंपनीकडे रत्नागिरीत वाहन विक्री करण्याचा परवाना नसल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हे शोरूम बंद केले होते.

मात्र या काळात शेकडो ग्राहकांकडे ओला दुचाकी गाड्या असल्याने त्यांची मोठी अडचण झाली होती. कंपनीकडून ‘फ्री सर्व्हिसिंग’चे आश्वासन देऊन विक्री करण्यात आलेल्या गाड्या शोरूम बंद पडल्याने दुरुस्तीशिवाय पडून राहिल्या. इतर कोणतेही मेकॅनिक या गाड्या दुरुस्तीसाठी घेत नसल्याने ग्राहक अक्षरशः हैराण झाले होते.

लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या गाड्यांची दुरुस्ती कोल्हापूरला नेऊन करावी लागणार, असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिला. दरम्यान शोरूम बंद करतानाही किंवा पुन्हा सुरु करतानाही कंपनीने ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नव्हती. या निष्काळजीपणामुळे ग्राहकांचा रोष शिगेला पोहोचला आणि शोरूम सुरु होताच त्यांचा संतापाचा उद्रेक झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *