मोठा परतावा देण्याचे गोंडस आमिष दाखवत सुरू झालेल्या टीडब्ल्यूजे (TWJ) कंपनीच्या गुंतवणुकीचा भस्मासूर आता उघड होत आहे. सुरुवातीला महिन्याला ५ टक्के व्याज देणाऱ्या या संस्थेचा परतावा गेल्या चार ते पाच महिन्यांपासून थांबला आहे.

त्यामुळे हजारो गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, चिपळूणसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.
२०१८ पासून कार्यरत असलेल्या या कंपनीची चकचकीत कार्यालये चिपळूण, गुहागर, पुणे अशा ठिकाणी उभी आहेत. चिपळूणच्या गुहागर बायपास रोडवरील कार्यालयातही मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. एक लाख रुपये गुंतवणुकीवर महिन्याला ५,००० रुपये आणि पुढे ३,००० रुपये असा व्याज दिला जात होता.
२५ लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला ५ टक्के परतावा आणि त्यांना ‘बिझनेस पार्टनर’ म्हणून सामावून घेण्याचा प्रयोगही कंपनीने राबवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून परतावा मिळणे बंद झाले आहे. कंपनीच्या हेल्थ आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कंपनीचे मुख्य संचालक समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दोघेही फोन उचलत नसल्याने अधिकच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालय व्यवस्थापकही नॉट रिचेबल असल्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान, गुंतवणूकदार विष्णू पतंगे आणि प्रथमेश माशीलकर यांनी आपली व्यथा सांगणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. कर्ज काढून गुंतवणूक केली; पण आता परतावा मिळत नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपल्यावर मोठे संकट ओढवले आहे, असे त्यांनी नमूद केले. या व्हिडिओमुळे समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे.
कंपनीकडून सिंगापूरमधून शेकडो कोटी रुपये येणार असल्याचे आश्वासन दिले जात असले तरी त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाईसाठी गुंतवणूकदार
एकत्र येण्याची शक्यता असून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचा विचार सुरू झाला आहे.
टीडब्ल्यूजेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासन व यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी चिपळूण परिसरातून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*