खेड : दाभिळ येथे खेळताना सेफ्टी टँकमध्ये पडून 3 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील दाभिळ येथील लेबर कॉलनीच्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असताना सेफ्टी टँकमध्ये पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल, २९ मे २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडली.


कार्तिक संजय गोरे (वय ३ वर्षे, ३ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सध्या दाभिळ नाका येथील एस.कॉन. कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये राहत होता. त्याचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आकडा बाळापूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक इतर लहान मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना बॉल संडासाच्या (सेफ्टी टँक) टाकीवर गेला. बॉल घेण्यासाठी कार्तिक टाकीच्या पत्र्याच्या बाजूने आतमध्ये गेला. त्याला पत्र्याचे झाकण असल्याचं लक्षात आलं नाही आणि तो टाकीतील पाण्यात पडला.


त्याच्यासोबत खेळत असलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने कॉलनीमधील एका महिलेने पाहिले. त्यांनी तात्काळ कॉलनीमधील आजूबाजूच्या लोकांना बोलावले. लोकांनी कार्तिकला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेने खेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *