दापोलीत घरफोडी 70 हजारांची रोकड लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यातील मौजे चंद्रनगर वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

तसेच, घरातील गृहोपयोगी साहित्य आणि बाहेर कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या लाकडांना आग लावून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना ६ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली.


याबाबत सखाराम हरी जगदाळे (वय ७२, रा. विठ्ठलमंदिराजवळ चंदनगर दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या मालकीच्या घराच्या डुप्लिकेट चावीचा वापर करून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकरची चावी घेऊन लॉकर उघडले आणि त्यातील ७० हजार रुपये चोरून नेले.


चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील गृहोपयोगी साहित्यावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून आग लावली, ज्यामुळे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कपडेलत्ते आणि लाईट फिटिंगच्या सामानाचा समावेश आहे. तसेच, घराला बाहेरून लॉक करून कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या लाकडांवरही ज्वालाग्राही पदार्थ टाकून आग लावण्यात आली.

दापोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४), ३२६(ग) आणि ३२४(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *