रत्नागिरी : येथे 85 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील तिवरी बंदर परिसरात एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५, रा. तिवरी बंदर वरवडे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत राणे हे आपल्या राहत्या घरी एकटेच वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान त्यांनी घराच्या पडवीतील छताच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तत्काळ धाव घेतली. त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वृद्ध व्यक्ती एकटे राहत असल्याने आणि कोणतीही स्पष्ट चिठ्ठी किंवा कारण समोर आले नसल्याने आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप गूढच आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तिवरी बंदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वृद्ध व्यक्तींच्या एकाकीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *