रत्नागिरी : पोमेंडी बुद्रुकमध्ये दारूच्या नशेत रिक्षाचालकाची 62 वर्षीय शेतकऱ्याला मारहाण

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने ६२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव रिक्षा अंगावर घालण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आरोपीने पाण्याच्या पाईपने शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

banner 728x90

जखमी शेतकऱ्याचे नाव सुरेश काळ्या पवार (वय ६२, रा. पोमेंडी बुद्रुक, बौद्धवाडी) असे असून, आरोपीचे नाव किशोर लकाजी पवार असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरेश पवार हे आपल्या घराजवळील नारळाच्या बागेतून गरे घेऊन घरी परतत होते. त्याचवेळी आरोपी किशोर पवार हा त्याची रिक्षा (क्र. एमएच-०८/एक्यू/१३७१) भरधाव वेगाने चालवत आला. फिर्यादीच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, प्रसंगावधान राखत सुरेश पवार यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शरद नागवेकर यांच्या अंगणात धाव घेत स्वतःचा बचाव केला.

मात्र, आरोपी तेथेच थांबला. रिक्षा बाजूला उभी करून तो खाली उतरला आणि दारूच्या नशेत अंगणातील पाण्याचा पाईप उचलून सुरेश पवार यांच्यावर तुटून पडला. आरोपीने त्यांना जमिनीवर पाडून पाईपने वारंवार मारहाण केली. यावेळी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत सुरेश पवार यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरेश पवार यांच्या तक्रारीवरून आरोपी किशोर लकाजी पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, घटनेमागील नेमके कारण आणि दोघांमधील वादाची पार्श्वभूमी याबाबतही चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *