Breaking News
रत्नागिरी : जैतापूर समुद्रात मासेमारी करताना खलाशाला समुद्री सापाचा दंश, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू लांजा : पहाटे महामार्गालगत संशयास्पद वावर, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी घेतले ताब्यात दाभोळ : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची दादरमध्ये भव्य सभा, वणौशी, दुमदेव, भिवबंदरचे ग्रामस्थ एकवटले, आरपारच्या लढ्याचा निर्धार, ‘जमीन आमची, निर्णयही आमचा’ म्हणत प्रकल्पाला विरोध चिपळूण : पहाटे अंधारात संशयास्पद हालचाली, चोरीच्या उद्देशाने दबा धरल्याचा संशय, तरुण पोलिसांच्या ताब्यात रायगड : ‘मी जीवन संपवतोय’, पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला, टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं

दाभोळ : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची दादरमध्ये भव्य सभा, वणौशी, दुमदेव, भिवबंदरचे ग्रामस्थ एकवटले, आरपारच्या लढ्याचा निर्धार, ‘जमीन आमची, निर्णयही आमचा’ म्हणत प्रकल्पाला विरोध

banner 468x60

प्रतिनिधी : सागर गोवळे, कोकण कट्टा न्यूज

दापोली तालुक्यातील दाभोळ येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून स्थानिक ग्रामस्थांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. दादर येथे झालेल्या भव्य ग्रामसभेत वणौशी, दुमदेव आणि भिवबंदर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी प्रस्तावित प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या जमिनी आणि परिसरावर परिणाम करणारा कोणताही निर्णय स्थानिकांच्या संमतीशिवाय घेऊ नये, अशी भूमिका मांडली.

दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या या सभेला महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच परिसरातील विविध घटकांची उपस्थिती होती. सभेदरम्यान ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सामूहिकपणे पुढील काळात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘जमीन आपली, मग प्रकल्प कोणासाठी?’

सभेत ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, बागायती, पारंपरिक उपजीविका आणि परिसराच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘जागा आपली, जमीन आपली; मग हा प्रकल्प कोणासाठी?’ असा सवाल करत प्रकल्पासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी प्रस्तावित प्रकल्पामुळे स्थानिकांच्या जमिनी, शेती-बागायती तसेच परिसरातील जीवनमानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे प्रकल्पाबाबत कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी ग्रामस्थांच्या आक्षेपांची दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

‘प्रकल्प होऊ देणार नाही’चा निर्धार

सभेत काही ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अधिक व्यापक पातळीवर आंदोलन उभारण्याची भूमिका मांडली. ‘जीव गेला तरी चालेल, पण अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही’, अशा शब्दांत काही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली. हा ग्रामस्थांचा संताप आणि प्रकल्पाबाबतची चिंता दर्शवणारा सूर असल्याचे सभेतून दिसून आले.

वणौशी, दुमदेव आणि भिवबंदर या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार केल्याने आगामी काळात या प्रकल्पाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळीवर आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रस्तावित दाभोळ-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक पातळीवर यापूर्वीही विरोध व्यक्त झाला असून वणौशी तर्फे पंचनदी ग्रामसभेत प्रकल्पाविरोधात ठराव करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

पुढील लढ्याची दिशा ठरणार

दादर येथील सभेत ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. येत्या काळात प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, तसेच ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासन कशा पद्धतीने पाहते, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचा विरोध आता वेगवेगळ्या गावांपुरता मर्यादित न राहता सामूहिक स्वरूप घेत असल्याचे या सभेतून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *