दापोली : भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; सहा प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

banner 468x60

दापोली : प्रतिनिधी सागर गोवळे
भातपिकाची वाढ जोमदार होण्यासाठी तसेच उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी युरियाचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याबाबत मुगीज येथे बीजांकुर गटाच्या वतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा परिसरातील सहा प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.

भातपिकाच्या वाढीच्या विविध अवस्थेनुसार युरियाचा वापर करणे आवश्यक असल्याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. खत देण्यापूर्वी शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढणे गरजेचे असून, युरियाचे संपूर्ण क्षेत्रात समान प्रमाणात वाटप करावे, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला.

युरिया पिकाला आवश्यक नत्र उपलब्ध करून देतो. योग्य प्रमाणात नत्र मिळाल्यास पिकाची वाढ, पानांचा हिरवेपणा आणि उत्पादक फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी भाताच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी माहिती प्रात्यक्षिकादरम्यान देण्यात आली.

अतिवृष्टी सुरू असताना युरिया किंवा इतर खतांचा वापर टाळावा, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे तसेच खत वापराची तारीख आणि प्रमाणाची नोंद ठेवावी, असेही सांगण्यात आले. प्रात्यक्षिकानंतर पिकाची वाढ, पानांचा हिरवेपणा आणि फुटव्यांची संख्या यांचे नियमित निरीक्षण करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला.

हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. विरेश चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *