राजापूर : घराच्या अंगणात स्वतःला पेटवून घेतले एम ल्या ससाळे येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

राजापूर तालुक्यातील ससाळे बौद्धवाडी येथील मयुरी मिलिंद तांबे (वय ४६) या महिलेचा मुंबईतील परेल येथील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मानसिक आरोग्याशी संबंधित त्रासातून त्यांनी २७ सप्टेंबर रोजी राहत्या घराच्या अंगणात स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेत त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. अखेर २ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी तांबे या गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील साईरूप हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ससाळे बौद्धवाडी येथील राहत्या घराच्या अंगणात त्यांनी माचिसच्या काडीने स्वतःच्या कपड्यांना आग लावून घेतली.

या घटनेत त्यांच्या मानेपासून पायापर्यंतचा भाग गंभीररीत्या भाजला. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी येथे उपचार घेतल्यानंतर अधिक वैद्यकीय उपचारांसाठी २९ सप्टेंबर रोजी मयुरी तांबे यांना मुंबईतील परेल येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ (ए) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

भोईवाडा पोलिसांकडून कागदपत्रे राजापूरला वर्ग

या घटनेनंतर मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य क्रमांकाने अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे भोईवाडा पोलिसांकडून टपालाद्वारे राजापूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली. २७ ऑक्टोबर रोजी ही कागदपत्रे राजापूर पोलिसांना प्राप्त झाली.

मृत महिलेचे छायाचित्र प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबर रोजी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांकाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे ससाळे बौद्धवाडी परिसरात शोक व्यक्त होत आहे. राजापूर पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *