आंबोली-नांगरतासवाडी येथे ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, दोघे गंभीर जखमी

banner 468x60

आंबोली : संकेश्वर-बांदा मार्गावरील आंबोली-नांगरतासवाडी येथे बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

banner 728x90

माणगाव-कट्टावाडी (ता. कुडाळ) येथील केशव दत्ताराम केसरकर (वय २७) आणि संतोष रामचंद्र धुरी (वय ३२) हे दोघे कारने आंबोलीमार्गे आजऱ्याकडे जात होते. नांगरतासवाडी येथे आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.


या अपघातात कारमध्ये अडकलेल्या केशव केसरकर आणि संतोष धुरी यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी बांबुळी (गोवा) येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातावेळी ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक चर्चा असून, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. अपघातामुळे संकेश्वर-बांदा मार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *