चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील 17 वर्षीय साहिल सुरेश भागडे या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी एकाच गावातील तिघांविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिलला कथित मानसिक त्रास देणे, त्याची बदनामी करणे आणि त्याच्यावर दबाव आणल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पांडुरंग विठ्ठल शेलार (३५), अंजली पांडुरंग शेलार आणि अनिल बळीराम पवार (३८), तिघेही रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण, यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०७ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक पंचनामा केला. यावेळी त्याच्या कपड्यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आल्याचे तपासात समोर आले आहे. या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींमुळे झालेला कथित मानसिक त्रास आणि बदनामी याबाबत उल्लेख असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, आरोपी अंजली शेलार या वहाळ येथील डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या रुग्णालयात कामाला असताना साहिलचा मोबाईल फोन वापरत होत्या. १ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्या साहिलच्या मोबाईलवरून अनिल पवार याच्याशी बोलत असताना त्यांचे पती पांडुरंग शेलार यांनी पाहिल्याचा आरोप आहे.
यानंतर या घटनेचा संबंध साहिलशी जोडून त्याच्यावर आरोप करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढे पांडुरंग शेलार यांनी साहिलला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यावर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे साहिलची गावात बदनामी झाली आणि त्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित तिघांनी संगनमताने केलेल्या कथित मानसिक छळामुळे आणि झालेल्या बदनामीमुळे साहिलने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सृष्टी सुधाकर भागडे (२९, रा. वहाळ घडशीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील आरोपांची सत्यता, चिठ्ठीतील मजकूर, संबंधित व्यक्तींमधील संवाद तसेच घटनाक्रम याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, मृत्यूपूर्वीची चिठ्ठी या तपासातील महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, तिच्या आधारे तसेच उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













