लांज्यात खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी, युवा सेनेचे अनोखे आंदोलन

banner 468x60

लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन केले. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. बैलगाड्यांसह करण्यात आलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

banner 728x90

लांजा शहरातील कुक्कुटपालन केंद्रापासून तहसील कार्यालयापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून, पादचारी आणि स्थानिक नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्गासोबतच लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था खड्डेमय झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे वारंवार करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना उबाठा पक्षाचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाड्यांसह चिखल नांगरणी स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या अनोख्या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, शहराध्यक्ष मोहन तोंडकरी, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *