लांजा : कांटे गावात अश्मयुगीन कातळशिल्पांचा अनमोल ठेवा; ५ ठिकाणी सापडली ६७ दुर्मीळ शिल्पे

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कांटे गावातील सड्यावर संशोधकांना ५ ठिकाणी तब्बल ६७ दुर्मीळ अश्मयुगीन कातळशिल्पांचा शोध लागला आहे. जलचर, भूचर, पक्षी तसेच विविध अनाकलनीय आकृत्यांनी सजलेल्या या कातळशिल्पांमुळे कोकणाच्या प्राचीन इतिहासाला आणि पुरातत्त्वीय वारशाला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

banner 728x90

कांटे येथील सड्यावर केशव बारसकर यांच्या जमिनीत स्थानिक द्रोपदी नेवरेकर यांनी ‘पांडवांची चित्रे’ म्हणून ओळखली जाणारी शिल्पे संशोधकांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच इतर ठिकाणांची माहिती लक्ष्मण होळकर यांनी उपलब्ध करून दिली. या माहितीच्या आधारे संशोधक मिलनाथ पातेरे, सोहम भांडे, मीत म्हात्रे, श्रावणी देशमुख, प्रीती कुमारी, भारती लोखंडे आणि धनंजय कुलकर्णी यांनी सखोल पाहणी करून कातळशिल्पांचा शोध लावला. या मोहिमेत विवेक कुर्तडकर आणि महादेव कुर्तडकर यांनीही मोलाचे सहकार्य केले.

गेल्या वर्षी याच परिसरात ३५ कातळशिल्पे सापडली होती. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली असता आणखी ३२ खोदचित्रे आढळली. त्यामुळे एकाच परिसरातील कातळशिल्पांची संख्या ६७ वर पोहोचली आहे.

या शिल्पांमध्ये बेडूक, मगर, विविध प्रकारचे मासे आणि समुद्रात आढळणाऱ्या ‘हॅमर शार्क’सारख्या माशाचे चित्र विशेष लक्षवेधी आहे. याशिवाय डुक्कर, माकड, कोल्हा, ‘कांडेचोर’ हा लहान सस्तन प्राणी, गोपद्म, मानवी पायांचे ठसे तसेच विविध अनाकलनीय आकृत्याही कोरलेल्या आहेत. सर्वात मोठे चित्र सुमारे ४ मीटर लांब असून, एका अंडाकृती आकृतीचा आकार ५ मीटर बाय ३ मीटर इतका आहे.

कांटे-जावडे गावांच्या सीमेवर एकाच मापाची चार मोठी गोपद्मे आढळली असून, परिसरात अश्मयुगीन दगडी हत्यारे, सूक्ष्म दगडी अवजारे आणि कोरही सापडले आहेत. या सर्व पुराव्यांचा अभ्यास करता, कोकणातील अश्मयुगीन मानव सुरुवातीला भटका होता आणि पुढे भटका-पशुपालक जीवनपद्धती स्वीकारली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे.

संशोधकांच्या मते, कांटे परिसरातील सड्यांवर अजूनही अनेक मोठी आणि महत्त्वपूर्ण कातळशिल्पे दडलेली असण्याची शक्यता असून, पुढील संशोधनातून आणखी महत्त्वाचे पुरातत्त्वीय पुरावे समोर येण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *