संगमेश्वरमध्ये एसटी बसचा अपघात, 16 चाकी ट्रकला मागून धडक, एक प्रवासी जखमी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीनजीक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बसने पुढे जाणाऱ्या १६ चाकी ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ एमएच ६४५० मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. आरवलीनजीक खेरशेत कासे फाटा येथे आल्यानंतर बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने पुढे जात असलेल्या १६ चाकी ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, एसटी बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेनंतर बसचा फटका पुढे असलेल्या मारुती वॅगनार कारलाही बसला. त्यामुळे कारचेही नुकसान झाले आहे.

या अपघातात एसटीमधील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, इतर काही प्रवाशांना किरकोळ मुकामार लागला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला एकेरी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. आता अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, या अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *