चिपळूण : स्प्रिंग क्लिनिकतर्फे खेंड शाळेला शैक्षणिक पुस्तकसंच भेट, डॉ. यतीन जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

banner 468x60

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्प्रिंग क्लिनिक, चिपळूण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खेंड येथील विद्यार्थी ग्रंथालयासाठी शैक्षणिक पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. स्प्रिंग क्लिनिकचे प्रमुख व त्वचा, सौंदर्य आणि लेसर विशेषज्ञ डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते हा पुस्तकसंच शाळेचे मुख्याध्यापक नरेश सदाशिव मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक नरेश मोरे यांनी डॉ. यतीन जाधव यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. पटसंख्या कमी झाल्यामुळे गेली तीन वर्षे बंद असलेली ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. जाधव यांच्यासह अनेकांनी मोलाचे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. यतीन जाधव यांच्यासोबत विलास कांबळे, प्रमोद गांगण, सुयोग कांबळे, नगरसेवक अंकुश आवले, नगरसेविका नीलम मोहिते, नगरसेवक शशिकांत मोदी, सुभाष चव्हाण, बापू साडविलकर, वैभव निवाते आणि श्रेयस शेलार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी पुन्हा उपलब्ध झाली, असे मुख्याध्यापक मोरे यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील शाळा पुन्हा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकसंच उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास आणि त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाने समाधान व्यक्त करत डॉ. यतीन जाधव यांचे अभिनंदन केले. सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील शाळांना नवी उभारी मिळू शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *