दापोली तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच पर्यटकांना विविध पर्यटनस्थळांना सहज भेट देता यावी, यासाठी दापोलीत ‘रेंट-अ-बाइक’ योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन दापोली शहरप्रमुख सुनील रिसबूड यांनी राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले.
दापोली हे कोकणातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून, येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन आकर्षणांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र, विविध पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना खासगी वाहने किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी दुचाकी भाड्याने उपलब्ध करून देणारी ‘रेंट-अ-बाइक’ योजना उपयुक्त ठरू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेमुळे पर्यटकांना स्वतःच्या सोयीनुसार दापोलीतील पर्यटनस्थळांना भेट देता येईल. त्याचबरोबर स्थानिक तरुणांना दुचाकी भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाने या मागणीचा सकारात्मक विचार करून योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक परवानग्या, नियम व अटी निश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग, भगवान घाडगे, शहर पालक राजेंद्र पेटकर, नगरसेविका प्रीती शिर्के, मंदार केळकर, ननदीम मुकादम, स्वरूप महाजन यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दापोलीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘रेंट-अ-बाइक’ योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे या मागणीवर शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो, याकडे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













