रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील तेलीवाडी परिसरात जुन्या तक्रारीचा आणि पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून एका दुचाकीस्वार तरुणाला पाच जणांनी मिळून लाकडी दांडक्याने व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. देवरुख तेलीवाडी येथील रोहित हरिश्चंद्र किर्वे (वय ३७) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून घरी जात होते. यावेळी नटेवाडी हरपुडे ते तेलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर गणपती विसर्जन घाटाच्या पुढील बाजूला असलेल्या गल्लीमध्ये त्यांना अडवण्यात आले.
यावेळी संशयित आरोपी समिक्षा सतिष किर्वे आणि सुगंधा सुरेश किर्वे यांनी रोहित किर्वे यांना रस्त्यात थांबवून लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर आणि मानेवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, त्यानंतर संशयित आरोपी सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे हे देखील घटनास्थळी आले. या तिघांनी लाकडी काठीने रोहित यांच्या कमरेवर, उजव्या व डाव्या हातावर तसेच पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता रोहित किर्वे यांना जमिनीवर पाडून त्यांच्या छातीवर लाथ मारून दुखापत केल्याचाही आरोप आहे.
या हल्ल्यात रोहित किर्वे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी रोहित हरिश्चंद्र किर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी देवरुख पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेमागे मागील तक्रारीचा आणि पूर्वीच्या वादाचा राग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुख पोलीस करत असून मारहाणीच्या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे देवरुखच्या तेलीवाडी परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस तपासानंतर या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













