देवरुखमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन करून कौटुंबिक कार्यक्रमासाठी अंगावर घालण्याच्या बहाण्याने उसने घेतलेले सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना दिलीप सावंत (वय ५९, मूळ रा. वसई पूर्व, सध्या रा. मार्लेश्वर हेरिटेज रो हाऊस, साडवली, ता. संगमेश्वर) या संतोष शेडगे यांच्या बंगल्यात भाड्याने वास्तव्यास आहेत. त्याच परिसरातील मार्लेश्वर हेरिटेज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अंकिता केशव पालव (वय ३२, मूळ रा. बिळवस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) हिची सावंत यांच्याशी ओळख होती.
ही ओळख असल्याने सावंत यांचा अंकिता पालव हिच्यावर विश्वास होता. याच विश्वासाचा फायदा घेत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता अंकिता पालव सावंत यांच्या घरी गेली. आपल्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्याचे सांगत तिने कार्यक्रमासाठी अंगावर घालण्याकरिता सोन्याचे मंगळसूत्र उसने मागितले.
शेजारी राहणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवून सावंत यांनी त्यांच्याकडील तीन तोळे वजनाचे जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे, अंकिता पालव हिच्या स्वाधीन केले.
मंगळसूत्र घेतल्यानंतर कौटुंबिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सावंत यांनी आपला दागिना परत मिळण्यासाठी अंकिता पालव हिच्याकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, मंगळसूत्र परत करण्याऐवजी ती विविध कारणे सांगून टाळाटाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वारंवार मागणी करूनही दागिना परत न मिळाल्याने सावंत यांना संशय आला. आपला विश्वासघात करून सोन्याचे मंगळसूत्र परत केले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत देवरुख पोलिसांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री अंकिता केशव पालव हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मंगळसूत्र आरोपीकडेच आहे का, त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













