संगमेश्वर : ‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ म्हणत धामापूर-कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचा स्वच्छता व विकासाचा संकल्प

banner 468x60

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीतील नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. ‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ या भावनेतून ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

banner 728x90

गावातील भराडीन देवी आणि वाघजाई देवी मंदिरात दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावणवाडी, भोजनेवाडी, मानेवाडी, गडगेवाडी, हळदवाडी, खडकेवाडी, चाफेवाडी, भेंलेवाडी आणि बौद्धवाडी या वाड्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यालगत वाढलेले गवत, झाडे-झुडपे तसेच वाहनांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटविण्यात आल्या.

गावात वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्याने विद्युत पोलवर वाढलेल्या वेली आणि झाडांच्या फांद्याही हटविण्यात आल्या. त्यामुळे वीजवाहिन्यांलगतचा परिसर स्वच्छ करण्यास मदत झाली. त्याचबरोबर रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने खडी व माती टाकून बुजविण्यात आले.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, रोलर, गॅस कटर आणि ग्रास कटिंग मशीन अशा विविध यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने श्रमदान करत स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मोहिमेदरम्यान अनेक टन कचरा गोळा करण्यात आला असून त्याची नियोजनबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैद्यकीय सुविधांचा अभाव, वयोवृद्ध रुग्णांना उपचारासाठी दूरवर न्यावे लागणे तसेच खराब रस्त्यांमुळे खासगी वाहने गावात येण्यास होणारी अडचण आणि विजेची समस्या यांसारख्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला आहे.

“गावातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. पुढील काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे,” अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुमित मिरगल यांनी दिली.

स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संदेश या उपक्रमातून ग्रामस्थांनी दिला. एकजुटीने केलेल्या या श्रमदानातून गावाच्या विकासाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिकांचीही आहे, हे अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *