संगमेश्वर : ‘तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत’; दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एलआयसी एजंटची ₹94,900 ची फसवणूक

banner 468x60

देवरूख येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एका भामट्याने देवरूख परिसरातील एलआयसी एजंटला व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची धमकी देत ९४ हजार ९०० रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या एजंटने गुगल पे तसेच स्कॅनरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवले. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी सुरू राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

या प्रकरणी एलआयसी एजंटच्या तक्रारीवरून देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एलआयसी एजंटला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे सांगितले. त्यानंतर एजंटविरोधात तक्रार दाखल झाल्याचा दावा करत, ‘तुमच्याविरोधात तक्रार आहे. तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत,’ अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली.

अचानक आलेल्या या धमकीमुळे एलआयसी एजंट घाबरला. त्याचा गैरफायदा घेत संबंधित भामट्याने प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली. अटकेच्या भीतीपोटी एजंटने सांगितलेल्या पद्धतीने गुगल पे आणि स्कॅनरच्या माध्यमातून तब्बल ९४ हजार ९०० रुपये संबंधित व्यक्तीच्या खात्यावर पाठवले.

पैसे पाठवल्यानंतरही समोरील व्यक्तीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे एजंटला संशय आला. आपण कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत नसताना केवळ धमकी देऊन आपल्याकडून पैसे उकळले जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तत्काळ देवरूख पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत देवरूख पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेला मोबाइल क्रमांक, बँक खाते आणि पैशांच्या व्यवहाराचा तपास सुरू केला आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

दरम्यान, व्हिडिओ कॉल करून आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवणे, अटकेची किंवा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे आणि त्यानंतर पैसे उकळणे, हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. कोणताही पोलीस अधिकारी अशा पद्धतीने व्हिडिओ कॉलवरून भीती दाखवून पैसे मागत नाही.

त्यामुळे अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून कोणतेही पैसे पाठवू नयेत, बँक खात्याची अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये आणि तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *