महाड : दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पडून संगमेश्वरमधील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, महाडमधील कावळे गावाजवळ दुर्घटना

Screenshot

banner 468x60

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करत असताना रेल्वेतून खाली पडल्याने २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना महाड तालुक्यातील कावळे गावाच्या हद्दीत घडली आहे. दीपक रहाटे असे मृत तरुणाचे नाव असून, ते संगमेश्वर येथील रहिवासी होते. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीपक रहाटे हे दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान महाड तालुक्यातील कावळे गावाजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी जवळून दुसरी रेल्वे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धाव
रेल्वेतून तरुण खाली पडल्याची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. यावेळी महाशक्ती ॲम्बुलन्सचे अनिल चव्हाण यांनी सहकार्य केले.

त्यांच्या मदतीने दीपक रहाटे यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
या घटनेनंतर महाड तालुका पोलिसांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुर्घटनेचे नेमके कारण आणि घडलेल्या परिस्थितीबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अवघ्या २८ वर्षांच्या दीपक रहाटे यांचा रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संगमेश्वर परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.