मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील कथित निष्काळजीपणामुळे कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूल गंभीर धोक्यात आले आहे. महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदाईनंतर बुधवारी (८ जुलै) शाळेच्या मागील बाजूस मोठी दरड कोसळल्याने सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने शाळेलगत खोदाई करताना आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे शाळेजवळील दोन मोठी झाडे उन्मळून इमारतीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने शाळेला नोटीस बजावत मुलींचे स्वच्छतागृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सुमारे १५० विद्यार्थिनींसाठी पर्यायी स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरडीमुळे शाळेच्या इमारतीलाही धोका निर्माण झाला असून, आणखी भूस्खलन झाल्यास संपूर्ण इमारत मातीखाली गाडली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरड तातडीने हटवून शाळेची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













