Breaking News
मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी दापोली : उपजिल्हा रुग्णालयातील बंद पडलेली डायलिसिस सेवा पुन्हा सुरू, ऋषी गुजर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीक बागवाडी येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील दागिने व रोकड लंपास केली. या घटनेमुळे बागवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.


याप्रकरणी योगिता रवींद्र फेफडे (वय ४०, मूळ रा. शिवणे, सध्या रा. श्रीराम नारायण कदम यांच्या घरी भाड्याने, बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत फिर्यादी यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजावर कोणत्यातरी कठीण हत्याराने प्रहार करून दरवाजा उचकटला आणि घरात प्रवेश केला.


घरात शिरल्यानंतर चोरट्याने हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटाचे लॉकर तोडले. त्यानंतर कपाटातील पत्र्याच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ८० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आणि २५ हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.
याशिवाय चांदीचे पैंजण, बाली, जोडवी, मासोळी, चांदीची वाटी, ब्रेसलेट आणि मनगट्या असे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले. तसेच ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरून नेण्यात आली. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या घटनेप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(१), ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बंद घराचा मागील दरवाजा उचकटून घरातील कपाट फोडत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीमागे कोणाचा हात आहे, याचा शोध देवरुख पोलीस घेत असून अज्ञात चोरट्यांचा कसून तपास सुरू आहे.