रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला, आतापर्यंत 70.94 टक्के पाऊस

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून, गेल्या २४ तासांत केवळ ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आणि रात्री पावसाचा जोर जाणवत असला, तरी दुपारच्या सुमारास उन्हाचे दर्शन होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २ हजार ३८६ मिमी म्हणजेच ७०.९४ टक्के पाऊस झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. नद्या आणि धरणांमधील पाणीसाठाही खालावला होता. मात्र, जूनच्या अखेरच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली.

जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, धरणे आणि जलसाठ्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. मात्र, जुलैनंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर सातत्याने कमी होत गेला. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही अद्याप मुसळधार पावसाची अपेक्षित नोंद झालेली नाही. सध्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सरासरी २० ते ३० मिमी पाऊस पडत आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात संततधार स्वरूपात का होईना, पाऊस झाल्याने भात आणि नाचणी पिकांना चांगला आधार मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, या काळात मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *