मंडणगड : गणेशोत्सवात मंडणगडच्या वाहतूक व्यवस्थेची परीक्षा, पार्किंग, खड्डे अन् काँक्रीटीकरणामुळे चिंता

banner 468x60

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शहरातून सुरू असलेले महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम, नवीन रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किंग, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तसेच बसस्थानक परिसरातील खराब रस्त्यांची स्थिती यामुळे गणेशोत्सव काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडणगड तालुक्यात हजारो भाविक, गणेशभक्त आणि पर्यटक दाखल होतात. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य चौक, बसस्थानक परिसर तसेच महामार्गालगतच्या भागात वाहनांची मोठी वर्दळ निर्माण होते. सध्या शहरात नियोजित पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या कडेला तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर उभी केली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यातच महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन प्रशासनासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. गणेशोत्सव काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करण्याबरोबरच तात्पुरती पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी नियुक्त करणे तसेच मुख्य चौकाजवळ तात्पुरता वाहतूक नियंत्रण कक्ष उभारल्यास वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते.

खड्ड्यांचा प्रश्नही ऐरणीवर

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तसेच मुख्य चौक परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. विशेषतः बसस्थानक परिसरातील रस्त्यांची खराब अवस्था प्रवाशांसह वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यांची डागडुजी करावी आणि बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘स्वच्छ, सुंदर मंडणगड’साठी तातडीच्या उपाययोजनांची गरज

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असून या काळात बाहेरून येणाऱ्या भाविकांसमोर शहराची सकारात्मक प्रतिमा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र मुख्य चौक, अंतर्गत रस्ते आणि बसस्थानक परिसरातील दुरवस्था यामुळे ‘स्वच्छ व सुंदर मंडणगड’ या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नियोजन करणे, तात्पुरती पार्किंग व्यवस्था उभारणे, महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक लावणे आणि शहरातील स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. भाविकांचे स्वागत स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित मंडणगडने व्हावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *