रत्नागिरी : पाचव्या दिवशीही संध्या कोसुंबकर यांचे उपोषण सुरू, वैद्यकीय तपासणीस उपोषणकर्त्यांचा नकार’निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार’; पोलीस अधीक्षक दखल घेणार का?

banner 468x60

राकेश जंगम प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, तसेच या प्रकरणात तत्कालीन जयगड पोलिस ठाण्याचे PSI कुलदीप पाटील यांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी संध्या कोसुंबकर यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे. पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांचा संताप वाढत आहे.

banner 728x90

मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याचे विवेक पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र, या भेटीनंतरही उपोषण मागे घेण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस घडामोड झालेली नाही. उपोषणकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला आहे. ‘आपली मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आणि तोपर्यंत स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घेणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता प्रशासनासमोर केवळ उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा प्रश्न नसून, त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी आणि परिस्थिती हाताळण्याचे आव्हानही उभे ठाकले आहे.

राकेश जंगम बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत समोर आलेले दावे, बेवारस सांगाडा, DNA तपासणी, मोबाईलच्या हालचाली आणि पोलिस तपासाबाबत उपस्थित करण्यात आलेले गंभीर प्रश्न यामुळे या प्रकरणाला संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे. राकेशच्या आईसोबत संध्या कोसुंबकर यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली आहे. PSI कुलदीप पाटील यांच्या भूमिकेची खातेस्तरीय चौकशी करावी, संबंधित कालावधीतील CDR तपासावा आणि राकेशच्या बेपत्ता होण्यापासून ते त्याच्या मृत्यूबाबत समोर आलेल्या दाव्यांपर्यंत संपूर्ण घटनाक्रमाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, उपोषणाचा पाचवा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून नेमका निर्णय काय, तपास कोणत्या टप्प्यावर आहे आणि उपोषणकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पोलीस अधीक्षक दखल घेणार का?

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोन महिला पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या असताना प्रशासनाची हालचाल केवळ भेटीगाठी आणि वैद्यकीय तपासणीच्या आग्रहापुरतीच मर्यादित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर प्रशासन जागे होणार की त्याआधीच त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने निर्णय घेतला जाणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः पुढाकार घेणार का? उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर स्वतंत्र चौकशीचे ठोस पाऊल उचलणार का? की प्रशासनाच्या दारात सुरू असलेला हा संघर्ष आणखी किती दिवस सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *