मंगळवेढा तालुक्यात लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथे घडलेल्या घटनेची धूळ अद्याप शांत झालेली नसतानाच, आता भोसे (बावची) येथील एका निष्पाप तरुणाला ‘लुटेरी दुल्हन’ आणि तिच्या साथीदारांनी लग्नाच्या जाळ्यात ओढून लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील एका महिलेला पुढे करून विवाहाचे नाटक रचण्यात आले. लग्नानंतर संबंधित महिलेचे आधीच लग्न झाले असून तिला एक मुलगी असल्याची माहिती समोर आली. ही बाब मुद्दाम लपवून मुलाकडील कुटुंबाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महिला अश्विनी मारुती धानोळे (रा. देवरुख, ता. संगमेश्वर) हिला पुढे करून पिंटू ऊर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर आणि युवराज कांबळे (सर्व रा. रेडी, ता. मंगळवेढा) यांनी हे संपूर्ण जाळे उभे केले होते. विवाहासाठी मुलगी असल्याचे सांगून त्यांनी भोसे येथील तरुणाच्या कुटुंबाशी संपर्क साधला.
या एजंटांच्या मध्यस्थीने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता भोसे येथील फिर्यादी तरुणाच्या राहत्या घरी लग्न सोहळा पार पडला. धार्मिक विधी, अक्षता आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडल्याने मुलाकडील कुटुंबाचा संशय दूर झाला. मात्र, हा विवाह नव्या संसाराची सुरुवात नसून फसवणुकीचा डाव असल्याचे काही दिवसांतच स्पष्ट झाले.
लग्न लावून देण्याच्या नावाखाली आरोपींनी मुलाकडील कुटुंबाकडून तब्बल १ लाख ५३ हजार रुपये रोख घेतले. तसेच दीड तोळ्याचे सोन्याचे गंठणही स्वीकारण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी नववधू आणि संबंधित एजंटांनी संपर्क तोडला. संशय निर्माण झाल्यानंतर चौकशी केली असता महिलेचे पूर्वी लग्न झाले असल्याचे आणि तिला एक मुलगी असल्याचे उघड झाले.
त्यानंतर आपण आर्थिक फसवणुकीला बळी पडलो असल्याची खात्री झाल्यावर पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी शिवाजी कोळेकर आणि युवराज कांबळे यांचा मंगळवेढा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक तरुणांना विवाहाच्या आमिषाने लुटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या टोळीच्या संपर्कातील इतर व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली सक्रिय असलेल्या अशा भामट्या टोळ्यांविषयी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













