पत्रकारांना शिवीगाळ करत जाहीरपणे धमकी दिल्याच्या आरोपानंतर खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना निर्भयपणे काम करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे, असे नमूद करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेने म्हटले आहे की, पत्रकारांवर दबाव आणण्याचा किंवा त्यांचे कामकाज अडथळ्यात आणण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेला घातक ठरू शकतो. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायद्यापुढे सर्वजण समान असल्याने कोणालाही विशेष वागणूक देऊ नये, अशी भूमिकाही परिषदेकडून मांडण्यात आली.
यावेळी पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या किंवा गैरवर्तनाच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास अशा प्रवृत्तींना बळ मिळेल, असा इशाराही देण्यात आला.
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, उपलब्ध तक्रारीची शहानिशा करून कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













