Breaking News
खेड : लवेलच्या जंगलाला पुन्हा वणवा! निसर्ग माहिती केंद्राच्या दारातच वणव्याचा भडका; दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव धोक्यात, वणवे रोखणार कोण? दापोली : काळकाई कोंड येथे रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद संगमेश्वर : तेलीवाडीत दुचाकीस्वार तरुणाला आधी महिलांनी मारलं नंतर तरुणांनी , पाच जणांकडून मारहाण, उजव्या हाताला फ्रॅक्चर, जुन्या तक्रारीचा आणि वादाचा राग मनात धरून हल्ला रत्नागिरी : हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा जप्त, 1.75 कोटींचा मुद्देमाल हस्तगत, ट्रकचालक अटकेत दापोली : काजूच्या बागेला आग, 720 झाडांसह पाइपलाइन जळून खाक, आठ एकरांतील बागेचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे 15 लाख रुपयांची वित्तहानी

खेड : लवेलच्या जंगलाला पुन्हा वणवा! निसर्ग माहिती केंद्राच्या दारातच वणव्याचा भडका; दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव धोक्यात, वणवे रोखणार कोण?

banner 468x60

निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या वनविभागाच्या निसर्ग माहिती केंद्राच्या परिसरालाच वणव्याचा विळखा पडू लागला आहे. खेड तालुक्यातील लवेल येथे शुक्रवारी दुपारी प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत पुन्हा वणवा भडकल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी फाट्यानजीक वणवा लागल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी लवेलमध्ये आगीचा भडका उडाला. त्यामुळे परिसरातील जंगल, दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लवेल गावाजवळील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. काही वेळातच आगीने परिसरातील गवत आणि झुडपांमध्ये फैलाव केल्याने वणव्याचे स्वरूप निर्माण झाले. हा वणवा वनविभागाच्या निसर्ग माहिती केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाजवळ पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

एका बाजूला जंगल, दुसऱ्या बाजूला औद्योगिक प्रकल्प!
लवेल परिसरात नामांकित शीतपेय निर्मिती कंपनीसह कोकण रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीचा परिसर आहे. तसेच वणवा लागलेल्या ठिकाणापासून रस्त्याच्या पलीकडे गॅस कंपनीदेखील आहे. त्यामुळे या भागात वारंवार आगीच्या घटना घडणे ही केवळ पर्यावरणाचीच नव्हे, तर औद्योगिक सुरक्षेचीही गंभीर बाब मानली जात आहे. आगीचा फैलाव औद्योगिक आस्थापनांच्या दिशेने झाल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१०० हून अधिक दुर्मिळ वनस्पतींच्या ठेव्याला वणव्याचा धोका!
काही दिवसांपूर्वीच या परिसरातील वनविभागाच्या निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी या परिसरात १०० हून अधिक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती असल्याची माहिती देण्यात आली होती. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आहे.

मात्र, याच निसर्गसंपन्न परिसरात वारंवार वणवे लागत असल्याने या वनसंपत्तीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी दुर्मिळ वनस्पती आणि औषधी वनस्पती पडल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते.

वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका!
स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात विविध वन्यप्राण्यांचा वावर आहे. वणव्यामुळे जंगलातील गवत, झुडपे आणि लहान वनस्पती जळून खाक होण्याबरोबरच वन्यजीवांच्या अधिवासावरही परिणाम होण्याची भीती आहे. आगीमुळे वन्यप्राण्यांना सुरक्षित आश्रयस्थान सोडून अन्यत्र स्थलांतर करावे लागू शकते.

लवेल परिसरात वारंवार वणवे लागत असल्याने या आगी नेमक्या कशामुळे लागतात, याची चौकशी होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील कोरडे गवत, मानवी निष्काळजीपणा किंवा अन्य कारणांमुळे अशा घटना घडत आहेत का, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

वनविभागाने संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त घालावी, वणवा प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात आणि आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

निसर्गाचा ठेवा जपण्यासाठी उभारलेले माहिती केंद्र आणि त्याच परिसरात धुमसणारे वणवे, हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे आहे. दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव आणि औद्योगिक आस्थापनांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का, असा सवाल लवेलवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.