समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरेच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमच्या वतीने रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला.

‘युवा प्रेरणा कट्टा’च्या माध्यमातून दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


यंदा या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याची स्पर्धा, तर उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी जवानांसाठी पत्रलेखन व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या तसेच जवानांसाठी पत्रे व कविता तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या विशाखापट्टणम येथील नौदलाच्या बेसवर पाठविण्यात आल्या. त्यामुळे दापोलीतील विद्यार्थ्यांच्या भावना थेट देशसेवेत कार्यरत असलेल्या नौदल जवानांपर्यंत पोहोचल्या.

याच उपक्रमाचा विस्तार करत रक्षाबंधनाच्या दिवशी दापोली पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या योगदानाबद्दल युवा प्रेरणा कट्ट्याच्या सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही राखी बांधण्यात आली. रुग्णांची सेवा, उपचार आणि आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करताना उपस्थितांमध्ये आपुलकीचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोरसकर, PSI यादव, साखरकर तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मोमीन, डॉ. बनसोडे, डॉ. भोजने, डॉ. मोघे यांच्यासह सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. युवा प्रेरणा कट्ट्याच्या सदस्यांनी उपस्थितांना राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकीचे आणि बंधुभावाचे नाते निर्माण करण्यासोबतच विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची दिशा मिळावी, या उद्देशाने युवा प्रेरणा कट्ट्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमातून देशाच्या सीमेवर कार्यरत जवानांपर्यंत प्रेम आणि कृतज्ञतेचा संदेश पोहोचविण्यात येत आहे. यंदा त्याच भावनेतून दापोलीतील पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही राखी बांधण्यात आल्याने या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.
या उपक्रमाचे नियोजन प्रीती वैद्य, गौरी खरे, पायल खानविलकर, गौरी खोत, अवंती केळकर, ऋतिक उगले, प्रमोद पांगारकर, सुमेध करमरकर, नचिकेत बेहरे, मिहीर महाजन आणि गौरव खरे यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्यामध्ये देशप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे, तसेच समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, या दोन्ही उद्देशांची सांगड घालणारा ‘युवा प्रेरणा कट्टा’चा रक्षाबंधन उपक्रम दापोलीत विशेष ठरला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













