चिपळूण : सावर्डे-चिपळूण परिसरात जुगार व दारूबंदीविरोधात पोलिसांची कारवाई

banner 468x60

सावर्डे आणि चिपळूण परिसरात पोलिसांनी जुगार व अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम तसेच गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.

सावर्डे बाजारपेठेतील गणपती मंदिराजवळील पत्र्याच्या एका खोक्यात २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी रविंद्र हरिश्चंद्र सुर्वे (५६, रा. खोतवाडी, सावर्डे) हा विनापरवाना कल्याण मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ गगनेश चंद्रकांत पटेकर यांच्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, नांदगाव गोसावीवाडी येथे सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अवैध गावठी दारूविरोधात कारवाई केली. एका घराशेजारी आंब्याच्या झाडाखाली प्रदीप रामचंद्र कांबळे (४५, रा. नांदगाव, ता. चिपळूण) हा विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून एकूण ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच, चिपळूणच्या खेर्डी बाजारपेठेत जंगम वडापावच्या मागील बाजूस रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आणखी एका मटका जुगारावर कारवाई केली. विलास सखाराम मिरगल (६५, रा. खेर्डी बाजारपेठ, चिपळूण) हा मुंबई-कल्याण मटका जुगाराच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळवत असल्याचे आढळले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण १२ हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये २,३०० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा Y18 मॉडेलचा अँड्रॉइड मोबाईल, २ रुपये किमतीचा निळ्या शाईचा बॉलपेन व जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोहेकॉ वृशाल सगुण शेटकर यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगार व अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *