Kokan  

राजापूर : गंगातीर्थ फाट्यावर दोन कारची भीषण धडक, कुटुंबातील चौघे जखमी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील गंगातीर्थ फाट्याजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टिगॉरला विरुद्ध दिशेने आलेल्या मारुती सुझुकी एर्टिगाने धडक दिली. या अपघातात टाटा टिगॉरमधील चालकासह त्यांची पत्नी, आई आणि मुलगी जखमी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित तुकाराम पाटील (वय ३५, रा. पनवेल, रायगड) हे आपल्या ताब्यातील टाटा टिगॉर (एमएच ४६ सीएच ९१९६) मधून पत्नी, आई आणि मुलीसह पनवेल येथून आचरा-मालवणच्या दिशेने जात होते.

राजापूर येथील गंगातीर्थ फाट्याजवळ त्यांची कार मुंबई-गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमधून जात असताना समोरून मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती सुझुकी एर्टिगा (एमएच ०५ एफव्ही ७२६९) अचानक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आली.

या एर्टिगाचा चालक शुभम नरेंद्र पाटील (वय २०, रा. कल्याण पश्चिम) याने रस्त्याच्या परिस्थितीचा योग्य अंदाज न घेता वाहन अतिवेगाने चालविले. त्याचे वाहन मुंबईकडे जाणारी लेन सोडून मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवरून विरुद्ध दिशेला आले आणि टाटा टिगॉरच्या समोर आडवे येऊन धडकले. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

या प्रकरणी प्रणित पाटील यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम नरेंद्र पाटील याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची नोंद ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.५२ वाजता करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *