रत्नागिरी : चर्मालय चाररस्त्यावर तरुणाची दुचाकी अडवून मारहाण, डोक्यात कड्याने वार

banner 468x60

रत्नागिरी शहरातील चर्मालय येथील चाररस्ता परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या डोक्यात हातातील कड्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन संजय धोत्रे (२३, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत आकाश चंद्रकांत खेत्री (२४, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आकाश खेत्री हे आपल्या दुचाकीवरून चर्मालय चाररस्ता परिसरातून जात होते. यावेळी संशयित रोहन धोत्रे याने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्यांच्याशी वाद घालत हातातील कड्याने आकाश यांच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

मारहाणीनंतर संशयिताने आकाश यांना शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर आकाश खेत्री यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी रोहन धोत्रे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 126(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *