Breaking News
दापोली : गिम्हवणे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न HPV लसीकरणाबाबत शंकांचे निरसन, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद, अवघ्या 10 दिवसांत प्रशासनाचा निर्णय रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळेत बंद घर फोडले; सोन्याचे दागिने, रोकड आणि डॉलर असा 8.73 लाखांचा मुद्देमाल लंपास खेड : घरात कपडे धुत असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली, खेडमध्ये दोघांवर गुन्हा दाखल चिपळूण : फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 हजारांची लाच प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी, उमेश राजेशिर्के यांच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचीही होणार चौकशी

रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळेत बंद घर फोडले; सोन्याचे दागिने, रोकड आणि डॉलर असा 8.73 लाखांचा मुद्देमाल लंपास

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अमेरिकन चलनातील ५४० डॉलर चोरीस गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शालिनी शंकर गंजे (वय ५०, गृहिणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या बहार बंगला क्रमांक ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी, एमआयडीसी मिरजोळे येथे वास्तव्यास आहेत.

शालिनी गंजे या ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून वैयक्तिक कामानिमित्त जळगाव येथे गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराला लक्ष्य केले.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शालिनी गंजे या रत्नागिरीला परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा रवींद्र पाटील यांनी त्यांना फोन केला. घराचे कुलूप तुटले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याची माहिती त्यांनी गंजे यांना दिली.

ही माहिती मिळताच गंजे यांनी तत्काळ रत्नागिरीकडे परतण्याचा प्रवास केला. त्या सायंकाळी सुमारे ६ वाजता घरी पोहोचल्या असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर कपाटांसह घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. यामध्ये सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, राणीहार, ब्रेसलेट, लक्ष्मीहार, कानातील डुल व टॉप्स, सोन्याचे तसेच डायमंडचे मंगळसूत्र आदी दागिन्यांचा समावेश आहे.

याशिवाय कपाटातील ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि अमेरिकन चलनातील ५४० डॉलर देखील चोरट्याने लंपास केले. अशा प्रकारे सोन्याचे दागिने, रोकड आणि परकीय चलन असा एकूण ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून १४ मिनिटांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घराची रेकी करून चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला असावा, असा प्राथमिक संशय असून, पोलिसांकडून परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. चोरीच्या घटनेचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, एमआयडीसी मिरजोळे परिसरातील बंद घर फोडून एवढ्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल चोरीला गेल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *