राजापूर : 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कौटुंबिक वादानंतर टोकाचे पाऊल

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कोदवली मांडवकर खालचीवाडी येथे एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादातून आणि दारूच्या नशेत संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार चंद्रकांत मांडवकर (वय २७, रा. कोदवली मांडवकर खालचीवाडी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार दिनांक २६ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ओंकार हा आपल्या राहत्या घरी होता. त्यावेळी घरामध्ये काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे तो मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे.

वादानंतर ओंकारने रागाच्या भरात तसेच दारूच्या नशेत घराच्या किचनच्या बाजूला असलेल्या पडवीत जाऊन लोखंडी बारला साडीच्या काठाने गळफास घेतला. काही वेळानंतर कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून ॲम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.


मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर स्पष्ट केले. या घटनेनंतर मांडवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत आवश्यक पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण केल्या. या प्रकरणी २७ मे २०२६ रोजी मध्यरात्री १:१४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून आत्महत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाचे स्वरूप तसेच इतर बाबींचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *