केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco Sensitive Area – ESA) घोषित करण्यासाठी मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुद्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील एकूण ३११ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. ही माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
मसुदा अधिसूचनेनुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या गावांतील स्थानिक रहिवाशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यास संबंधित व्यक्तींना आक्षेप अथवा हरकती नोंदवता येणार आहेत. पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ मधील तरतुदींनुसार मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत नागरिकांना आपल्या हरकती सादर करता येतील.
नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात ‘पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३’ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय गावांची संख्या
तालुका प्रस्तावित गावे
खेड ८५
संगमेश्वर ८१
राजापूर ५१
लांजा ५०
चिपळूण ४४
एकूण ३११
महाराष्ट्रातील २,५१५ गावांचा प्रस्तावित समावेश
दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांतील एकूण २ हजार ५१५ गावांचा पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.
या मसुदा अधिसूचनेमुळे संबंधित गावांमधील स्थानिक नागरिक, शेतकरी आणि इतर घटकांच्या हितसंबंधांबाबत चर्चा होण्याची शक्यता असून, नागरिकांना दिलेल्या ६० दिवसांच्या मुदतीत आपल्या हरकती व सूचना शासनाकडे सादर करता येणार आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













