संगमेश्वर तालुक्यातील कर्ली-रावंगणवाडी येथील २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आशिष दिपक रावंगण (वय २३, रा. कर्ली, रावंगणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रावंगणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आशिष रावंगण याने आपल्या राहत्या घराच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन केले. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.
आशिषची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २८ ऑगस्ट रोजी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्याला कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही आशिषच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवरुख पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
आशिषच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून आवश्यक तपास व कार्यवाही सुरू आहे. तरुण वयात आशिषचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













