गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष रेल्वे सेवांमध्ये आणखी ३४ गणपती विशेष गाड्यांची भर पडली आहे. तसेच पनवेल ते चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशभरातून सुमारे ३५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची मागणी आणि गर्दीचा आढावा घेऊन ही संख्या ३७० पर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे सेवांचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाहतूक सुरळीत राहावी आणि नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने यापूर्वी २६२ गणपती विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये २०० आरक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वे सेवांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगावदरम्यान चार विशेष गाड्या
नव्या निर्णयानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान चार आरक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या १६ आणि १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होतील आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता मडगाव येथे पोहोचतील.
पनवेल-चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू फेऱ्या
कोकणातील प्रवाशांसाठी पनवेल-चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. १० ते १४ सप्टेंबर तसेच १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत या विशेष मेमूच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत.
पनवेलहून ही मेमू दुपारी ३.२० वाजता सुटून रात्री १०.२० वाजता चिपळूणला पोहोचेल. परतीच्या प्रवासात चिपळूणहून सकाळी ९ वाजता सेवा रवाना होऊन दुपारी २.३० वाजता पनवेलला पोहोचणार आहे. या विशेष सेवेचे आरक्षण ८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
२६२ विशेष फेऱ्यांचे नियोजन
मध्य रेल्वेच्या गणपती विशेष रेल्वे नियोजनात एकूण २६२ फेऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. आरक्षित सेवांमध्ये वातानुकूलित गाड्यांसह शयनयान आणि सामान्य डब्यांची मिश्र रचना असलेल्या विशेष गाड्यांचाही समावेश आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणातील विविध स्थानकांकडे या विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी रवाना होत असताना अतिरिक्त रेल्वे सेवांमुळे नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे..

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













