संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला आर्थिक वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्याविरुद्ध माखजन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोंडीवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. तिचा आणि आरोपीचा एक हजार व दोन हजार रुपये या रकमेच्या हिशोबावरून आर्थिक वाद सुरू होता. याच वादातून ४ सप्टेंबर रोजी आरोपीने पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत दगडफेक केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर महिलेने माखजन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(r)(s) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच विनयभंगाच्या आरोपाचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तपासाला गती दिली असून घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात चर्चा सुरू आहे.
महिलेच्या सुरक्षेसाठी तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













